कोल्हापूर : कोल्हापुरातील
शेंडा पार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा आयटी पार्कसाठी एमआयडीसीला
हस्तांतरित करण्यास मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत
झालेल्या विशेष बैठकीत तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. कृषी विद्यापीठाला या
जागेच्या बदल्यात देण्यात येणाऱ्या पर्यायी जागा दहा दिवसांत सुचवा, असे आदेश यावेळी पवार यांनी दिले.
दरम्यान, त्या बदल्यात कृषी विद्यापीठाला जिल्ह्यातील
अन्य ठिकाणी ६० ते १०० हेक्टर एकत्रित पर्यायी जागा देण्यात येणार आहे. ही जागा
निश्चित करण्यासाठी मंगळवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली.
बैठकीला
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तर कोल्हापुरातून ऑनलाईन पद्धतीने पालकमंत्री प्रकाश
आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री
हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी
अमोल येडगे, आमदार अमल महाडिक
उपस्थित होते.
राज्याच्या विकासासाठी कृषी आणि उद्योग
या दोन्ही क्षेत्रांचा समतोल विकास
महत्वाचा आहे. शेती संशोधनाच्या क्षेत्रात विद्यापीठांनी नेहमीच महत्वाची भूमिका
बजावली आहे. त्यांना आवश्यक सुविधा तसेच शेती, शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यक्रमासाठी पुरेशी, अनुकूल जागा उपलब्ध करून देण्याची
जबाबदारी शासनाची आहे. राज्याने काळाची र गरज ओळखून उद्योगस्नेही धोरण स्वीकारले
आहे. त्यातून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यातून राज्याचा
आर्थिक विकास आणि रोजगाराची संधी उपलब्ध करण्याची उद्दिष्टे साध्य होणार आहेत.
कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून युवकांना स्थानिक
पातळीवर रोजगार उपलब्ध होणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
शेंडा पार्क येथील
विद्यापीठाची पूर्वीची शहराबाहेरील जागा आता मध्यवर्ती भागात आली आहे. आयटी
पार्कसाठी शहरातील जागा आवश्यक आहे, असे सांगत पवार म्हणाले, कृषी संशोधनासाठी शहराबाहेरील जागाही
उपयोगात आणता येईल. त्यामुळे आयटी पार्कसाठी शेंडा पार्कच्या जागेची निवड केली
आहे. त्या बदल्यात विद्यापीठाला कागल, पन्हाळा, हातकणंगले,
राधानगरी तालुक्यातील वीज, पाणी, रस्त्यांच्या सोयींनी युक्त शेतीयोग्य
पर्यायी जागा, विद्यापीठाच्या
अधिकाऱ्यांच्या सहमतीने उपलब्ध करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्या जागेचा विकासही करून देऊ, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला नियोजन
विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश
देशमुख, पुण्याचे विभागीय
आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, एमआयडीसीचे
मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे
कुल सचिव डॉ. नितीन दानवले, अप्पर
जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी
उपजिल्हाधिकारी संजय तेली आदी उपस्थित होते.
0 Comments